मुंबई. राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाचा अजून एक रुग्ण रत्नागिरीत सापडला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आजपर्यंत रत्नागिरीतील हा तिसरा रुग्ण आहे. ही एक 52 वर्षीय महिला असून ती गृहिणी आहे.
औरंगाबादमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. मृत व्यक्तीचा मुलगा आणि सूनेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या 17 वर्षीय मुलीलाही विषाणूची लागण झाली आहे.
दरम्यान पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या तीन नागरिकांचा आज (मंगळवारी) सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तिघांचेही वय 60 वर्षापुढील आहे. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. यासोबत पुण्यातील मृतांचा आकडा आता 8 वर पोहोचला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
एमपीएससीच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधनात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने 26 एप्रिल व 10 मे 2020 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवेच्या इतर परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांसंदर्भात सुधारित दिनांक संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे.