जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित निवृत्त शिक्षक महिलेची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या महिलेच्या संपर्कातील दु:खीनगरातील नातेवाईक, खासगी रुग्णालयातील उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक तसेच शहागड येथील कोरोना पॉझिटिव्ह तबलिगी आणि इतर असे 60 जणांचे स्वॅब सोमवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 37 औरंगाबाद तर 23 स्वॅब पुणे येथे पाठवले आहेत. या सर्वांच रिपोर्ट मंगळवारी सायंकाळपर्यंत येऊ शकतात. शिवाय, मंगळवारीही काही स्वॅब पाठवले जात आहेत.
दिल्ली, हैद्राबाद येथून प्रवास करून आल्यावर सदरील महिलेला सर्दी, खोकला, तापेची लक्षणे दिसून आल्यामुळे तिला प्रथम दोन खासगी रुग्णालयात व त्यानंतर ३ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, ५ तारखेला स्वॅब पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आला. यामुळे जिल्हा प्रशासनाने दु:खी नगर सील केले. तर सदर महिलेच्या मुख्याध्यापक मुलीने रांजणी गावात पोषण आहार केल्यामुळे ते गावसुद्धा सील करण्यात आले आहे. सध्या दु:खी नगर भागात आरोग्य पथकाकडून प्रत्येक कुटूंबाची तपासणी सुरू आहे. तर सदर बाधित महिलेच्या संपर्कातील लोकांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात उपचार करणारे १ डॉक्टर होम क्वॉरंटाईन तर १५ परिचािरका व ४ कक्षसेवकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहेत. मात्र, त्यांचे स्वॅब मंगळवारी दुपारपर्यंत घेतले नव्हते. प्रतिबंधात्मक उपचार सुरू होते.