मुंबई. देशभरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 339 वर पोहचला आहे. महत्वाचं म्हणजे, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आपापल्या घरातच राहण्याचे आवाहन केले आहे .
अजित पवार म्हणाले की, ''कोरोनापासून बचावासाठी ‘होम क्वारंटाइन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. कोरोना संक्रमित होऊन ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वारंटाइन’ व्हावे आणि स्वत:सोबतच कुटुंबाचे संरक्षण करावे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील,'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
कोरोना रुग्णात हलगरजीपणामुळे वाढ होत चालली आहे. दिल्लीतील मरकज घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही पवार म्हणाले. तसेच, आज राज्यात रामनवमी भक्ती भावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे कोरोना तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. त्याची सुरुवात काल झाली आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.